Pages

Sunday, 18 August 2013

रक्षाबंधन



              आयुष्य हे खूप साऱ्या नात्यांनी गुंफलेलं असत ...अगदी एखाद्या सुरेख हारासारख. काही  नाती जन्माने मिळतात तर काही अगदी नकळत जुळतात. काही नाती जवळची असून सुद्धा मनापर्यंत पोहचत नाहीत आणि काही नाती खूप लांबची असून सुद्धा ऋणानुबंध संपत नाहीत...!
या सगळ्या नात्यांमध्ये अगदी जन्मापासून असणारं आणि मरेपर्यंत साथ देणारं कुठल नात असेल तर ते भाऊ आणि बहिणीच...! आज थोडं माझ्या आणि तुमच्या भावांविषयी लिहितेय,रक्षाबंधनाच्या निमित्ताने...

               लहानपणी आपण  सगळ्यात जास्त कुणाबरोबर राहिलो ? आई - बाबा -आजी-आजोबा-कि शिक्षक ?  नाही!!!  सगळ्यात जास्त आपण  भावाबरोबर किवा बहिणीबरोबर राहिलो...

               एकत्र उठलो, पहिला बाथरूम  आंघोळीला कुणाला यासाठी भांडलो ,एका ताटात जेवलो,एकत्र शाळेला गेलो, लहान भावासाठी पुस्तक जपून वापरली, एकत्र अभ्यास केला किंवा कधी घेतला, एकत्र खेळलो ,एकमेकांचे कपडे वापरले (आजही वापरतो), आणि कधी-कधी मारही एकत्रच खाल्ला!  नेमक्या शब्दांत सांगायचं तर एकाच घरात, समान आयुष्य आपण एकमेकांसोबत जगलो ...लहानचे मोठे आपण एकत्र झालो . आपल्यातले सगळे बदल, मग ते प्रगतीपुस्तकातले असोत किंवा वागण्यातले कुणी खूप जवळून अनुभवले असतील तर ते भावानेच!

                कितीतरी  गोष्टी असतात ना लहानपणीच्या आठवण्यासारख्या ?
                बागेमध्ये केलेले वाळूमधले किल्ले , चोर-पोलिसांचा खेळ, शेजाऱ्यांच्या घरात येणाऱ्या तक्रारी, थोडा जरी असला तरी  एकत्र वाटून खाल्लेला खाऊ, क्रिकेट मध्ये  'common  player ' वरून झालेली भांडण ,घरामध्ये मोठ्यांच्या झालेल्या भांडणात एकमेकांना दिलेला आधार, घरी कितीही एकमेकांना पाण्यात बघीतलं तरी बाहेर गेल्यावर सहजपणे घेतली गेलेली एकमेकांची काळजी,त्याला मारताना आडवं गेल्यामुळे खाल्लेला बाबांचा मार , उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये केलेली धमाल, वाढदिवसासाठी स्वतःहून तयार केलेलं ग्रिटिंग किंवा गिफ्ट, तिन्हीसांजेला म्हंटलेल 'शुभम करोति कल्याणंम ', शाळेमध्ये वाढदिवस झाल्यावर 'वाटून खायचं ' म्हणून खिशातच ठेवलेलं चोकलेट, त्याचं Gathering जवळून बघायला मिळावं म्हणून लवकर जावून पकडलेली जागा, हाताला हात धरून बरेचदा केलेला रोड-क्रॉस आणि तोच हात गर्दीत सुटला तर झालेली मनाची घालमेल....!

                 भाऊ  मोठा असला  तर  शाळेत  एखाद्या शिबिराला किंवा स्पर्धेला  नाव देताना स्वतःबरोबर आपले नाव ही न विसरता देईल ....teenage  मध्ये कधी make -up  मध्ये बघीतलं तर 'काय तोंड रंगवलं आहेस?'  अशी comment  देणारा भाऊ  'साडी डे' किंवा ' valentine day  ' ला अगदी न सांगता सोडायला येईल ....'हे काय विचित्र  कपडे घातले आहेस बदल ते पहिला' असे बाबांच्यापेक्षा धाकात सांगणारा तोच दादा   Fresher party  किंवा Farewell च्या रात्री १२-१ वाजेपर्यंत जागेल आणि वर सांगेल 'अग ,submission  होत , म्हणून जागा राहिलो '.....  तुमच्या प्रोजेक्ट च्या प्रिंट outs जर रात्री उशिरा मिळणार असतील तर तो न सांगता कलेक्ट करेल....किंवा तुमचे उद्या presentation  असेल आणि नेमका आधी २ दिवस आधी सेट-उप उडाला तर सायकल वरून भर दुपारच्या उन्हात तो तुम्हाला XP ची  CD  कुठल्यातरी मित्राकडून आणून देईल... तुमचे mobile  calls - friend  circles - तुमचा अड्डा या सगळ्या गोष्टींवर तो न कळतच लक्ष्य ठेवेल ...आणि जर कुठे चुकलात सर्वांसमोर  शिव्या घालायलाही कमी करणार नाही....  खरच, न सांगता आणि न दाखवता किती काळजी घेतात न आपले भाऊ ?

                  ज्या गोष्टी मोठ्या भावाच्या तशाच काही लहान भावाच्या सुद्धा ...! तो लहान असेल तर तुमच्याच हातून जेवेल,तुमच्याच कुशीत झोपेल....त्याला खेळायलाही तुम्हीच लागाल.... तुमच्या परीक्षा म्हणजे त्याच्यासाठी भयाण काळ ....त्याला रिक्षा मामा काय म्हणाले इथपासून कुठला मित्र बाद आहे इथपर्यंत तो तुम्हालाच share  करेल सगळ...कधीतरी ऐकूनच धक्का बसेल की त्याच्या मित्र-मैत्रीणींच्यात तुमचे सगळे सद्गुण माहित आहेत  :)  दीदी माझ हे कर, दीदी मला हेच पाहिजे ,आज तूच ये शाळेत सोडायला...एक न दोन गोष्टी....!

                 आपल्याला  भावाची आणि त्याला आपली किंमत तर नेहमीच असते, पण ती तेव्हा  कळते  जेव्हा आपण लग्न करून सासरी जाणार असतो... बहिणीच  लग्न काय ठरत आणि यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक पडतो...तो तुमच्याशी भांडण करायचं सोडून automatically Good -brother  बनतो...
तो तुमच्यासाठी कॉर्न-भेल पार्सल आणेल किंवा एरवी हात पण लावू न देणाऱ्या त्याच्या गाडीमधून / गाडीवरून फिरवून आणेल...कधीतरी तुम्ही त्याच्याकडे हट्टाने मागितलेली आणि त्याला खूप प्रिय असलेली गोष्ट तो तुम्हाला सहजच देवून टाकेल ...किंवा घरात तुम्ही नसताना आपले लहानपणीचे सगळे फोटो काढून बघत बसेल...लग्न ठरल्यावर धमकी म्हणून जरी तुम्ही म्हणालात कि,  'म्हण काय म्हणायचे ते , बोलून घे , आता थोडेच दिवस आहेत तुला बोलायला ' तर त्याच्या डोळ्यात नक्की पाणी येईल...आणि रोज अगदी सुट्टी संपत आल्यासारखा तो उठल्यावर एक एक दिवस ठरलेल्या तारखेतून कॅलेंडरवर वजा करत राहील...आठवणींची गोळाबेरीज करत...!!!

                    खर तर हे नातंच  अस आहे  कि तुम्ही अंतराने लांब आहात म्हणून लांब जात नाही किंवा लग्न झाल म्हणून  त्यामध्ये फरक पडत नाही.  जर कुठे तुम्हाला " माया,काळजी,ओढ ,आशीर्वाद ,निरागसता , परखडपणा ,निस्वार्थी प्रेम "  हे सर्व गुण  एकत्र पाहायला  मिळाल तर त्याला " भाऊ" अस नाव असेल...!!आयुष्य बदलत जात, तो निसर्गाचा नियम आहे . कधी कधी माणसंही बदलतात सोयीप्रमाण , पण तुमच्या मनात तुमच्या भावासाठी आणि त्याच्या मनात तुमच्या साठी असलेली जागा कायम तशीच राहते...

                     मला रक्षाबंधनाच्या दिवशी एवढच सांगावस वाटेल माझ्या Brothers ना



भावा, तू बरोबर असताना मला
माझाही आधार लागत नाही
तू फक्त  आनंदात आणि सोबत  राहा
आज मी दुसर काही मागत नाही...!!

रक्षाबंधनाच्या खूप खूप  शुभेच्या  : )



 

3 comments:

  1. खूप छान ,
    भाऊ बहिणीच्या नात्यात असेच प्रेम कायम राहू दे.

    ReplyDelete